मुंबई: मुंबईत पावसाने कहर केला असून मुंबई उपनगरातील चेंबूर परिसरात घरावर भिंत कोसळून १७ नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर आरसीएफ परिसरातील भारत नगर येथे एका दुसऱ्या दुर्घटनेत दरड कोसळून आणखी तिघांचा मृत्यू झाला. या बरोबरच विक्रोळीत देखील घर कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान चेंबरमधील दुर्घटनास्थळी मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भेट दिली. यावेळी येथील डोंगरावर राहत असलेल्या नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
चेंबूर परिसरात अनेक ठिकाणी उंट टेकड्यांवर नागरिक वस्त्या करून राहत आहेत. मुंबईतील अशा परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. रात्रीपासून मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उंच टेकड्यांवर राहणाऱ्या लोकांचा बळी गेला आहे. मात्र, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल असे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारकडून नियमाप्रमाणे मृतांच्या नातेवाईकांना मदत दिली जाईल असेही ते म्हणाले.