गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून वाहून गेला, नालासोपाऱ्यातील 4 वर्षांचा चिमुरडा अद्यापही बेपत्ता
नालासोपारा : मुसळधार पावसात गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून वाहून गेलेला 4 वर्षांचा मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. नालासोपारा पूर्व भागातील बिलालपाडा परिसरात रविवारी ही घटना घडली. अनमोल सिंग असे पावसामुळे साचलेल्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे.
वसई विरार महापालिका अग्निशमन दल, स्थानिक रहिवासी यांच्याकडून चिमुरड्याचा शोध सुरु आहे, मात्र तो अद्यापही सापडलेला नाही. नालासोपारा पूर्व बिलालपाड्याच्या हनुमान नगर चाळीमध्ये रविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती. घटनेला 24 तासांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही मुलगा कुठेच सापडला नसल्याने त्याचे कुटुंबीय मात्र हवालदिल झाले आहेत.
आजूबाजूचे नैसर्गिक नाले भूमाफियांनी बुजवली असल्याने मुसळधार पावसाचे पाणी पूर्णपणे चाळीत भरले होते. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने आपल्या घरासमोर पाण्यात खेळताना मुलगा वाहत जाऊन उघड्या चेंबरमध्ये पडला असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.