महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी आदेश दिल्यानंतर प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकांनी धाडी टाकत बार सील केले.
ठाणे : करोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारत शहरातील १५ लेडीज बार सील केले आहेत. महापालिकेच्या या कारवाईने बार चालकांचे चांगलेच धाबे दणाणले असून शहरात करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, मास्क वापरण्यासोबत सुरक्षिततेच्या इतर नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर सर्व बार आणि रेस्टॉरंट, लेडीज बार आणि इतर आस्थापने सोमवार ते शुक्रवार ५० टक्के बैठक क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे तसेच सायंकाळी ४ वाजल्यानंतर आणि शनिवार, रविवार फक्त टेक अवे, पार्सल सुविधा, होम डिलिव्हरी सेवा सुरु ठेवण्याविषयी आदेश जारी करण्यात आले आहेत.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिल्यानंतर प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकांनी धाडी टाकत बार सील केले.
कोणते बार झाले सील?
ठाण्यातील तलावपाळी येथील आम्रपाली बार, तीन पेट्रोल पंप येथील अॅन्टीक पॅलेस बार, उपवन येथील नटराज बार, सिनेवंडर येथील आयकॉन बार, कापुरबावडी येथील स्वागत बार, नळपाडा येथील नक्षत्र बार, पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील के-नाईट बार, ओवळा नाका येथील स्टरलिंग बार, मॉडेला नाका येथील अॅन्जेल बार, उपवन येथील सुर संगम बार, भाईंदरपाडा येथील खुशी आणि मैफील बार, वागळे इस्टेटमधील सिझर पार्क बार, नौपाड्यातील मनिष बार आणि कापूरबावडी येथील सनसिटी बार असे एकूण १५ लेडीज बार सील करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेने दिली.
या सर्व कारवाया अतिक्रमण आणि निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर, प्रणाली घोंगे, शंकर पाटोळे आणि विजयकुमार जाधव यांनी महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने केल्या.