अमेरिकेने आगीशी खेळू नये; तैवानच्या लष्करी मदतीवरुन चीनचा थयथयाट, वचनभंग केल्याचा आरोप
वृत्तसंस्था, तैपेई: तैवान हा चीनच्या हितसंबंधांचा मुख्य मुद्दा असून, अमेरिकेने चीनबरोबरील संबंधांमध्ये ही सीमारेषा ओलांडू नये, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे.;तसेच अमेरिका आगीशी खेळ खेळत आहे, असा आरोपही चीनने केला आहे.
अमेरिकेने नुकतेच तैवानला शस्त्रास्त्रांची विक्री करण्याची आणि अन्य मदत करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून वरील भूमिका मांडली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, ‘शस्त्रास्त्र विक्रीची घोषणा ‘एक चीन’ तत्त्वाचा आणि अमेरिका-चीन यांच्यातील तीन संयुक्त निवेदनांचा भंग आहे. ही गोष्ट चीनचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या हितसंबंधांचे उल्लंघन आहे; तसेच तैवानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देणार नाही, या अमेरिकी नेत्यांच्या वचनांचाही भंग आहे. यातून, अमेरिकेने तैवानमधील फुटीरतावादी शक्तींना चुकीचा संदेश दिला आहे. अमेरिकेकडून तैवानला दिलेली मदत ही त्यांच्यावरच उलटणार असून, तैवानच्या मदतीने चीनला रोखण्याचे प्रयत्न अंतिमत: अपयशीच ठरणार आहेत.’ अमेरिकेच्या या कृत्यामुळे तैवानच्या सामुद्रधुनीच्या परिसरातील शांतता व स्थैर्याला धोका पोहोचणार असून, अमेरिकेने हा शस्त्रास्त्रांचा पुरवठा तातडीने थांबवावा, असे आहन करण्यात आले आहे.
तैवानला ५७.१३ कोटी डॉलरची शस्त्रास्त्रे व अन्य लष्करी मदत देण्याची; तसेच आवश्यक प्रशिक्षण देण्याची घोषणा व्हाइट हाऊसने शुक्रवारी केली होती; तसेच नियंत्रण, दळणवळण व अन्य प्रणालींच्या आधुनिकीकरणासाठीही मदत जाहीर करण्यात आली. तैवानने या मदतीसाठी अमेरिकेचे आभार मानले आहे.
शांततेच्या दृष्टीने तैवानचा मुद्दा महत्त्वाचा’
वॉशिंग्टन : तैवान हा जागतिक शांततेच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांनी १५ डिसेंबर रोजी जपानचे दिवंगत माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्या पत्नी अकी अबेची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी तैवानसह अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर अबे यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, ट्रम्प यांनी पनामा कालवाही ताब्यात घेणार असल्याचे म्हटले आहे. चीननेही त्यावर टीका केली आहे.