ऑस्करमध्ये ऐश्वर्याच्या जोधा अकबरमधल्या लेहंग्याची निवड, भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे कारण
मुंबई– ऐश्वर्या राय बच्चन सध्या चित्रपटांमध्ये जास्त वेळ घालवत नाही, पण आजही तिच्या चाहत्यांना तिला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म काम करताना पाहायचे आहे. ऐश्वर्या राय सुद्धा भारतात जास्त कार्यक्रम किंवा सिनेमे करत नसली तरी जागतिक स्तरावर भारताचे वैभव दाखविण्याची ती एकही संधी सोडत नाही. अशातच एकेक काळी आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या ऐश्वर्या राय बच्चनवर आणखी एका जबाबदारीचा भार आला आहे. जोधा अकबर चित्रपटात अभिनेत्रीने परिधान केलेला लेहेंगा आता ऑस्कर सोहळ्यात दिसणार, काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ.
ऐशचा जोधा-अकबर २००८ मध्ये आला होता
ऐश्वर्या राय २००८ मध्ये जोधा अकबर या चित्रपटात दिसली होती ज्यामध्ये तिच्यासोबत हृतिक रोशनही दिसला होता. या सिनेमाची निर्मिती आशुतोष गोवारीकर यांनी केली होती. त्याकाळी हा चित्रपट बराच वादात सापडला असला तरी बॉक्स ऑफिसवर याने चांगली कमाई केली होती. या सिनेमाचा अलिशान सेट आणि अप्रतिम दृश्यांनी चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते.
जोधाचा लेहेंगा ऑस्करपर्यंत पोहोचला
२००८ मध्ये, ऐश्वर्या रायच्या ‘जोधा अकबर’ चित्रपटात, निर्मात्यांनी अभिनेत्रीला राणीसारखा आणि रॉयल लुक देण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. तिला वेगवेगळे लेहेंगा, साड्या आणि दागिने घालायला लावले. आता ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने हा लेहेंगा संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवला आहे. हा तोच लेहेंगा आहे जो अभिनेत्रीने तिच्या चित्रपटात लग्नाच्या सीनवेळी परिधान केला होता.
नीता लुल्लाने लेहेंगा डिझाइन केला होता
‘जोधा अकबर’मध्ये ऐश्वर्या रायने लग्नात घातलेला लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाइन केला होता. नीता लुल्लाचा हा लेहेंगा एक उत्कृष्ट नमुना आहे, जो आता संपूर्ण जग पाहणार आहे. ऑस्कर म्युझियमने हा लेहेंगा त्याच्या आगामी प्रदर्शनासाठी ठेवला आहे. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने यासंदर्भात एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये डमीवर लेहेंगा घातला आहे. या व्हिडिओमध्ये ‘जोधा अकबर’मधील काही सीन्स देखील आहेत, ज्यामध्ये हृतिक रोशन अकबरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय.