भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?
जर्मनी : तालेब याने भर बाजारात कार का घुसवली, हे दुसऱ्या दिवसापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. पूर्वाश्रमीचा मुस्लिम असल्याचे सांगणाऱ्या तालेबने दररोज डझनभर ट्वीट (एक्स) आणि रिट्वीट्स केल्याचे समोर आले आहे. यांमध्ये इस्लामविरोधी संकल्पना, धर्मावर टीका आणि धर्म सोडलेल्या मुस्लिमांचे अभिनंदन करण्यात आल्याचे आढळते.
सर्वत्र ख्रिसमसच्या तयारीची लगबग असताना, जर्मनीच्या मॅग्डेबर्ग शहरावर शोककळा पसरली. एका सौदी डॉक्टरने आपली बीएमडब्ल्यू कार जाणूनबुजून येथील गर्दीच्या ख्रिसमस मार्केटमध्ये घुसवून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना चिरडले. या हल्ल्यात एका बालकासह पाच जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे २०० जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी ५० वर्षीय हल्लेखोराला अटक करून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पेशाने डॉक्टर असलेला हल्लेखोर मागील दोन दशकांपासून जर्मनीत वास्तव्यास असून, तो मॅग्डेबर्गच्या दक्षिणेस सुमारे ४० किलोमीटरवर असलेल्या बर्नबर्ग येथे प्रॅक्टिस करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दोनवरून पाच झाली आहे, तर २००हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत’, असे सॅक्सोनी-अनहॉल्ट राज्याचे गव्हर्नर रिनर हॅसेलॉफ यांनी पत्रकारांना सांगितले. तर, ‘जखमींपैकी ४० जणांनी स्थिती गंभीर आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल खूप काळजी वाटत आहे’, असे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी नमूद केले. हल्लेखोराचे नाव तालेब ए. असल्याचे जर्मनीतील अनेक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. मात्र, गोपनीयतेच्या कायद्यानुसार त्याचे आडनाव उघड करण्यात आलेले नाही. तालेब मानसोपचारतज्ज्ञ असल्याचे सांगण्यात येते. मानसोपचारतज्ज्ञ असूनही त्याने अशाप्रकारचे पाऊल का उचलले हे अद्याप समोर आलेलं नाही.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने कार हल्ला झालेल्या परिसरासह संपूर्ण जर्मनी हादरलं आहे. ख्रिसमस अगदी तोंडावर असताना हे कृत्य डॉक्टरने का घडवून आणलं याचा तपास सुरू आहे. भर रहदारीच्या वेळी, गर्दीच्या बाजारात घडलेल्या या घटनेने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.