शिक्षण

युवा महोत्सवात २९५ महाविद्यालये सहभागी होणार; सादरीकरणाचे वेळापत्रक जाहीर, विद्यापीठाचे नियमावलीवर ‘लक्ष’

आशिष चौधरी, छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने युवा महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीवर अधिक लक्ष दिले. प्रवेशावेळी दिला जाणारा कायम नोंदणी क्रमांकसह (पीआरएन) आधारकार्ड क्रमांक, मागील वर्षीच्या गुणपत्रिकेसह दहावीची सनद सादर करण्याचे निर्देश महाविद्यालयांना दिले. यासह विद्यार्थी कलावंत सादरीकरण करत असलेल्या प्रकारात काही आक्षेपार्ह नाही, अशाप्रकारचे हमीपत्र प्राचार्यांना द्यावे लागले. १८८० विद्यार्थी कलावंत महोत्सवात सहभागी होत असून सोमवारी सायंकाळपर्यंत नियमावलीनुसार कागदपत्र सादर करण्यासाठी सहभागी महाविद्यालयांची लगबग सुरु होती.

विद्यापीठाचा केंद्रीय युवा महोत्सव २५ ते २८ डिसेंबर दरम्यान होणार आहे. महोत्सवात सहभागी महाविद्यालयांसाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. ऑनलाइन नोंदणी करून हार्ड कॉपी विद्यापीठाला सादर करण्याचे निर्देश महाविद्यालयांना दिले होते. अनेक महाविद्यालये विद्यार्थी कलावंताचे वय, महाविद्यालयीन विद्यार्थी असावा अशा निकषांकडे दुर्लक्ष करत असल्याने यंदा प्रक्रिया ऑनलाइन करत नियमावलीत अनेक बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार विद्यार्थी विकास मंडळाकडे कागदपत्र सादर करण्यासाठी महाविद्यालयांना २३ डिसेंबरपर्यंत मुदत होती. सोमवारी अनेक महाविद्यालयांची निकषानुसार विद्यार्थ्यांचे कागदपत्र सादर करण्यासाठीची लगबग विभागात सुरु होती. विद्यापीठाने ‘वयाची अट’ नियमासाठी विद्यार्थ्यांची दहावीची सनद, आधारकार्ड क्रमांक सादर करण्याचे निर्देश दिले होते. यासह महाविद्यालयीन प्रवेशावेळी दिला जाणारा पंधरा अंकी ‘पीआरएन’ क्रमांक, मागील वर्षी परीक्षेत उत्तीर्ण झालेली गुणपत्रिका सादर करणे अशी नियम निश्चित केले. त्यानुसार अर्जांची तपासणी होईल विद्यार्थी विकास मंडळाकडे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी सांगितले.

शोभायात्रेने सुरूवात-
यंदा महोत्सवात २९५ महाविद्यालयातील १८८० विद्यार्थी सहभागी होत आहेत. विद्यार्थी संख्या निश्चितीनंतर विद्यार्थ्यांसाठीच्या निवास व्यवस्था, भोजन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात शोभायात्रेने होणार आहे. मुख्य सोहळा नाटयशास्त्र विभागाशेजारील सृजनरंग या मंचावर होणार आहे. तर लोकरंग (नाटयगृह परिसर), नाट्यरंग (नाटयगृह), नाद रंग (कबड्डी मैदान), शब्दरंग (क्रीडा विभाग) व ललित रंग (ललित कला विभाग) या सहा ठिकाणी विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहेत. २५ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यापीठातील पूर्णाकृती पुतळ्यापासून शोभायात्रा निघणार आहे. देशासमोरील ज्वलंत विषयावर संघ आपले देखावे सादर करणार आहेत. यानंतर ही शोभायात्रा सृजनरंग या मुख्य रंगमाच जवळ पोहचणार आहे.

  • रंगमंच एक ‘सृजनरंग’ उदघाटन, समारोप. लोक/आदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य, जलसा, लावणी, कव्वाली, पोवाडा, सुरवाद्य.
  • रंगमंच क्रमांक दोन- ‘लोकरंग’ येथे पोवाडा, भारुड, वासुदेव, गोंधळ, भजन, लोकगीत, लोकनाट्यचे सादरीकरण.
  • रंगमंच तीन – ‘नाट्यरंग’ येथे एकांकिका, पाश्चात्य समूह गायन, प्रहसन, मिमिक्री, शास्त्रीय नृत्य, मूकअभिनय, जलसा स्पर्धा.
  • रंगमंच चार – ‘नादरंग’ येथे गायन, तालवाद्य, सुर वाद्य, सुगम गायन (भा.), सुगम गायन (पा.), समूह गायन (भा.), समूह गायन (पा.), लोक वाद्यवृंद, कव्वाली, जलसा.
  • रंगमंच पाच – ‘शब्दरंग’ येथे काव्यवाचन, वादविवाद, वक्तृत्व, प्रश्नमंजूषा सादरीकरण.
  • रंगमंच सहा- ‘ललितरंग’ येथे चित्रकला, कोलाज, पोस्टर, मृदमूर्तीकला, व्यंगचित्रकला, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी, लघुपट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *