करमणूक

साऊथ Vs बॉलिवूड! अल्लू अर्जुन की वरुण धवन… बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? ‘बेबी जॉन’ची सुरुवात दणक्यात

मुंबई: वरुण धवनचा धमाकेदार ॲक्शन एंटरटेनर ‘बेबी जॉन’ हा सिनेमा २०२४ या वर्षातील शेवटचा मोठा बॉलिवूड रिलीज आहे. या चित्रपटाची चांगली आगाऊ बुकिंग झाली. स्पॉट बुकिंगवर खूप भर होता आणि सुरुवातीच्या दिवशी जे अपेक्षित होते ते केले. कालिस यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली सुरुवात केली आहे. असे असले तरी ब्लॉकबस्टर ‘पुष्पा २’ने बुधवारी २१व्या दिवशीही चांगली कमाई केली. याचा फटका ‘बेबी जॉन’ला बसला आहे.

ख्रिसमसचा दिवस बॉक्स ऑफिससाठी खास ठरला. ‘पुष्पा २’, ‘मुफासा: द लायन किंग’ आणि ‘बेबी जॉन’, हे तिन्ही चित्रपट पाहण्यासाठी २५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. यामध्ये अल्लू अर्जुनच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांचा कल सर्वाधिक होता. नवीन रिलीज असणाऱ्या ‘बेबी जॉन’च्या कमाईत आधीच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा २’ आणि ‘मुफासा’मुळे घट झाली.

‘बेबी जॉन’ची किती झाली कमाई?

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘बेबी जॉन’ने पहिल्या दिवशी देशभरात १२.५० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. रिलीजपूर्वी, आगाऊ बुकिंगमधून सिनेमाने ३.५२ कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर स्पॉट बुकिंगमधून मिळणाऱ्या कमाईतही वाढ झाली. ही कमाई वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आगाऊ बुकिंगसाठी ‘बेबी जॉन’ला तीन दिवसांचा अवधी मिळाला होता.

एक मास मूव्ही, ॲक्शन फिल्म आणि हॉलिडे रिलीज असल्याने ‘बेबी जॉन’ने पहिल्या दिवशी आणखी जास्त कमाई केली असती, पण असे झाले नाही. याचे कारण म्हणजे सकाळच्या आणि दिवसभराच्या शोजनंतर सायंकाळच्या आणि रात्रीच्या शोमध्ये प्रेक्षकांच्या संख्येत फारशी वाढ झाली नाही. ‘बेबी जॉन’चे बजेट १८५ कोटी रुपये आहे, सध्या ज्या बजेटचे चित्रपट बनतात त्या दृष्टीने हे फार नाही. त्यामुळे या चित्रपटाला अजूनही संधी आहे. रीलिजनंतर पहिलाच वीकेंड पाच दिवसांचा मिळाला आहे, त्यामुळे या कमाईत वाढ होऊ शकते. या वर्षातील आणखी एक हिट चित्रपट होण्याकडे ‘बेबी जॉन’ वाटचाल करू शकतो.

पुष्पा २ला अजूनही प्रेक्षकांची पसंती

२५ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २ – द रुल’ पुन्हा हिंदी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची पहिली पसंती राहिला. रिलीजच्या २१व्या दिवशी सिनेमाच्या हिंदी आवृत्तीमधून १५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. तर पाचही भाषांचा समावेश केला असता, या सिनेमाने बुधवारी १९.७५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पुढचे काही दिवस या कमाईत घट होईल असे चिन्ह नाही. आतापर्यंत या सिनेमाने हिंदीमध्ये ११०९.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हिंदी व्हर्जनने आतापर्यंत ७१६.६५ कोटी, तर तेलुगू आवृत्तीने ३१६.३० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *