हॉकी स्टार वरुण कुमारवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, दोन दिवसांपूर्वीच मिळाले होते DSP पद
बेंगळुरू: बेंगळुरू पोलिसांनी अर्जुन पुरस्कार विजेता भारतीय हॉकीपटू वरुण कुमार याच्याविरुद्ध POCSO (लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरुणने अल्पवयीन असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. २२ वर्षीय महिलेने सोमवारी तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, २०१८ मध्ये ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून वरुणच्या संपर्कात आली आणि ती १७ वर्षांची असताना या खेळाडूने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.
काय आहे नेमका आरोप?
२०१८ मध्ये जेव्हा ती वरुणच्या संपर्कात आली तेव्हा ती १७ वर्षांची होती, असा दावा महिलेने केला आहे. त्यावेळी वरुण येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) केंद्रात प्रशिक्षण घेत होता. २०२१ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेल्या वरुणला नुकतीच पंजाब पोलिसात उपअधीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. “महिलेच्या तक्रारीच्या आधारे, आम्ही सोमवारी हॉकीपटूविरुद्ध मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्याच्या योग्य कलमांतर्गत आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.” असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताच्या स्टँडबाय यादीत असलेला वरुण सध्या आगामी एफआयएच प्रो लीगसाठी भुवनेश्वरमध्ये राष्ट्रीय संघासोबत प्रशिक्षण घेत आहे. भारताचा पहिला सामना १० फेब्रुवारीला स्पेनशी होणार आहे. २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग असलेला वरुण फरार असल्याची चर्चा होती पण हॉकी इंडियाने ही अफवा फेटाळून लावली. हॉकी इंडियाच्या सूत्राने सांगितले की, ‘तो फरार नाही. तो संघासह भुवनेश्वरमध्ये आहे.’ हिमाचल प्रदेशामधील असलेल्या वरुणने २०१७ मध्ये भारतासाठी पदार्पण केले.