क्रीडा

IND v PAK : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, आशिया चषक सलग तिसऱ्यांदा जिंकला

संजय घारपुरे : भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय साकारत विजेतेपदाची हॅट्रीक साधली. कारण भारताने आता सलग तिसऱ्यांदा आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.

भारताच्या ज्युनियर हॉकी संघाने आशियाई हॉकीतील आपले वर्चस्व अधोरेखित केले. अरजितसिंग हुंदाल याच्या चार गोलच्या जोरावर भारताने बुधवारी अंतिम लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ५-३ अशी मात केली आणि विजेतेपद राखले. भारताने या स्पर्धेत एकही लढत गमावली नाही. भारताने ही स्पर्धा पाचव्यांदा जिंकली आहे. भारताने २००४, २००८, २०१५ आणि २०२३मध्येही विजेतेपद जिंकले होते.

ही स्पर्धा २०२१मध्ये करोनामुळे झाली नव्हती. भारताने या स्पर्धेत गटसाखळीत एकतर्फी वर्चस्व राखले होते. त्यानंतर उपांत्य फेरीत मलेशियाचे आव्हान सहज परतवले होते. अंतिम लढतीतही भारताने सफाईदार खेळ केला. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचललेल्या अरजितने चौथ्या, १८व्या आणि ५४व्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. त्याशिवाय त्याने ४७व्या मिनिटास मैदानी गोल केला. भारताचा पाचवा गोल धीरजसिंगने (१९ मि.) केला होता. पाकिस्तानकडून सुफयान खानने (३०, ३९ मि.) पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल केले होते, तर हन्नान शाहिदीने तिसऱ्या मिनिटास मैदानी गोल करून पाकला आघाडीवर नेले होते. मात्र, त्यानंतर भारताचा सुरू झालेला धडाका पाकला रोखता आला नाही.

सुरुवातीस चेंडूवरील वर्चस्वासाठी चांगली लढत झाली होती. मात्र, दुसऱ्या सत्रापासून भारताचे वर्चस्व दिसू लागले. त्यात भारताने दोन मिनिटांत दोन गोल केले होते. पाकने विश्रांती नजिक येत असताना भारताची आघाडी कमी केली होती. तिसऱ्या सत्रात पाकने बरोबरी साधली होती. मात्र, अरजितने त्यानंतर पाकच्या बचावफळीवरील दडपण वाढवत नेत भारतास आघाडीवर नेले होते. अखेरच्या सत्रात पाकने प्रतिकार जास्त तीव्र केला. मात्र, अरजितने सहा मिनिटे असताना गोल करून भारताचा विजय निश्चित केला.

अंतिम फेरीत पाकविरुद्ध चौथ्यांदा यश भारताने आशियाई ज्युनियर हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला चौथ्यांदा पराभूत केले. यापूर्वी २००४च्या स्पर्धेतील निर्णायक लढतीत ५-२ अशी बाजी मारली होती. त्यानंतर २०१५च्या लढतीत ६-२ आणि २०२३च्या अंतिम लढतीत २-१ असा विजय मिळवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *