परदेशात

Kazakhstan Plane Crash: प्रवास केवळ ५७ मिनिटांचा, पण ‘ते’ विमान अडीच तास हवेत; भीषण अपघाताआधी काय काय घडलं?

अस्ताना: कझाकिस्तानात विमानाच्या भीषण अपघातात ४२ जणांचा मृत्यू झाला. अझरबैजान एअरलाईन्सचं विमान धावपट्टीवर उतरत असताना अपघातग्रस्त झालं. एअरलाईन्सचं एम्ब्रेयर E190AR विमान बाकूहून रशियाच्या चेचेन्याला जात होतं. या विमानात ६७ जण होते. दुर्घटनेतून २५ जण बचावले आहेत. अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. विमान एकाएकी कित्येक फूट खाली आलं आणि जमिनीवर कोसळताच त्यानं पेट घेतला. विमानाचे दोन तुकडे झाले.

अझरबैजान एअरलाईन्सचं विमान धावपट्टीवर आदळलं. त्यानंतर विमानाला आग लागली. बचाव पथकानं विमानातील जखमी प्रवाशांची सुटका केली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघाताचे, बचाव कार्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अपघातस्थळापासून दूरपर्यंत प्रवाशांचे मृतदेह पसरले होते. जखमी झालेले प्रवासी मदतीसाठी आरडाओरड करत होते. अनेकांना असह्य वेदना सुरु होत्या. ते वेदनेनं विव्हळत होते.

विमानानं अपघातापूर्वी विमानतळाच्या भोवती एक चक्कर टाकली. त्यानंतर ते अचानक खाली कोसळलं. अवघ्या काही सेकंदांमध्ये विमान कित्येक फूट खाली आलं. E190AR विमानानं बाकूहून स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी उड्डाण केलं. ५७ मिनिटांनी ते चेचेन्याच्या ग्रोन्जी विमानतळावर उतरणं अपेक्षित होतं. पण विमानानं उड्डाण केल्यानं काही मिनिटांतच त्याला पक्षानं धडक दिली. त्यानंतर विमान २ तास ३३ मिनिटं हवेत होतं. फ्लाईट ट्रॅकिंग साईट फ्लाईटरडार२४ नुसार वैमानिकानं एक तास विमान उंचावर नेण्याचा प्रयत्न केला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत विमान हवेत असताना कधी वर तर कधी खाली येताना दिसत आहे. फ्लाईट ट्रेकिंग साईट्सनी विमानाच्या उड्डाणाचा एक नकाशा प्रसिद्ध केला आहे. त्यात विमान हवेत असताना नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. जवळपास ७४ मिनिटं विमान हवेतच खाली वर होत होतं. वैमानिकानं विमान लँड करण्याचा प्रयत्न केला असावा, पण तो अपयशी ठरल्याचं नागरी उड्डाण विभागानं सांगितलं. फ्लाईटरडार२४ च्या माहितीनुसार, विमानाला ग्रोन्जी विमानतळाजवळ जीपीएस जॅमिंग आणि स्पूफिंगचा सामना करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *