Prakash Mahajan : राज-उद्धव भेटीने मनसे नेता ‘दिल से’ सुखावला; अत्यंत कौतुकास्पद! शेवटी त्या दोघा भावांनी ठरवलं…
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले. राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधूंमध्ये अत्यंत सौहार्दाचा संवाद पाहायला मिळाला. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी दोघे एकत्र येण्याची चर्चा पुन्हा फेर धरु झाली आहे. भाजप, शिवसेना यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर सकारात्मकता दर्शवली होती. त्यानंतर आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
प्रकाश महाजन काय म्हणाले?
दोन भावांनी कधीही एकत्र येणं हे अत्यंत कौतुकास्पद आहे, स्तुत्यप्रिय आहे, पण शेवटी त्या दोघा भावांनी ठरवलं पाहिजे. जर दोन भाऊ एकत्र आले, तर आम्हा कार्यकर्त्यांना त्याची अडचण वाटण्याचं काही कारणच नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली.
प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीत प्रकाश महाजन यांनी बीडचे भयावह रूप बदलावं म्हणून खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष घालावं, असं मत मांडलं.
संजय राऊत काय म्हणाले होते?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. आणि त्या चर्चांमध्ये माझ्यासारखा माणूसही सहभागी होतो. राज ठाकरेंसोबत मी जवळून काम केलं आहे. त्यांचं माझ्याशी अनेक वर्षांचं मित्रत्वाचं नातं राहिलं आहे, तर उद्धव ठाकरे माझ्या पक्षाचे नेते आहे. तेही माझ्या जवळचे आहेत. दोन भाऊ एकत्र आले, याचा महाराष्ट्राला नक्कीच आनंद होता. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं जीवापाड प्रेम आहे. या कुटुंबाचं महाराष्ट्राशी एक नातं आहे. कोणत्याही ठाकरेंकडे त्याच दृष्टीने मराठी माणूस पाहतो, असं संजय राऊत म्हणाले होते.
निमित्त काय?
राज ठाकरे यांची सख्खी बहीण जयजयवंती यांचा मुलगा यश देशपांडे यांच्या विवाहानिमित्त राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. इतकंच नव्हे, तर विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर टीकेचे बाण सोडणारे ठाकरे बंधू चक्क आनंदाने गप्पा मारताना दिसले. उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या कानात काहीतरी कुजबुजताना दिसले. मनसे आणि ठाकरे गटाच्या समर्थकाना हे दोघं एकत्र येण्याचं ‘सुखचित्र’ पाहण्याची उत्सुकता लागली आहे. राजकीय पटलावरही ते दोघं एकत्र येणार का, याची चर्चा आता पुन्हा नव्याने रंगू लागली आहे.