राजकारण

Rahul Kardile : नाशिक मनपा आयुक्तपदी कर्डिले, भाजपचा बडा मंत्री नाराज, ‘टीम’मधील IAS अधिकाऱ्याबद्दल फडणवीसांचा मोठा निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याऐवजी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती झाल्याने भाजपचा एक बडा मंत्री नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या नाराजीमुळे कर्डिले यांच्या आयुक्तपदावरील नियुक्तीला अवघ्या काही तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंडी तात्पुरती स्थगिती दिल्याची चर्चा आहे.

आगामी सिंहस्थासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट आयएएस असलेल्या कर्डिले यांची नियुक्ती केली असताना हे मंत्रिमहोदय आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यासाठी रुसून बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांची मर्जी सांभाळण्याचा निर्णय घेतल्यास ‘एनएमआरडीए’च्या आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे पालिकेचा तात्पुरता पदभार जाण्याची शक्यता आहे.

नाशिक महापालिकेला गेल्या सहा वर्षांत तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारा एकही आयुक्त मिळाला नाही. त्याचा थेट परिणाम नाशिकच्या विकासावर झाला आहे. डॉ. अशोक करंजकर यांनीही राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे पालिकेच्या कारभारातून अंग काढून घेतले. त्यात दोन निवडणुकांचा आचारसंहितेमुळे आणि पालिकेतील प्रशासकीय राजवटीमुळे कारभार पूर्णपणे भरकटला आहे. त्यामुळे नाशिकसाठी थेट आणि नव्या दमाचा आयएएस अधिकारी द्यावा अधिक मागणी भाजपच्या आमदारांनी केली होती. त्यामुळे महायुती सरकार येताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजकीय हस्तक्षेप झुगारून वर्ध्याचे जिल्हाधिकारी कर्डिले यांच्याकडे नाशिक आयुक्तपदाची धुरा
कोणत्याही मंत्री आणि आमदारांना न विचारता त्यांनी आपल्या ‘टीम’मधील कर्डिले यांची आयुक्तपदी नियुक्ती केली. आतापर्यंतचा कर्डिले यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव बघता कोणताही वाद नसल्यामुळे त्यांच्या नियुक्तीवरून नाशिककरांमध्ये समाधानाचे वातावरण होते. पालिकेतील भ्रष्टाचाराला आळा बसणार असल्याने या नियुक्तीमुळे नाशिककरांसह आमदारही खुश झाले. मात्र, भाजपच्या संबंधित मंत्र्यांच्या दबावामुळे अवघ्या काही तासांतच त्यांची बदली स्थगित झाल्याची चर्चा आता प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

संबंधित मंत्रिमहोदय हे नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. आगामी सिंहस्थासाठी नाशिकवरील आपली कमांड अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना आपल्या मर्जीतील अधिकारी हवा आहे. कर्डिलंच्या नियुक्तीमुळे मंत्रिमहोदय नाराज झाले आहेत. कर्डिले यांची त्यांना विश्वासात घेऊन नियुक्ती न झाल्याचेदेखील सांगितले जाते. त्यामुळे पालिका आयुक्तपदाचा पुन्हा तिढा निर्माण झाल्याची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात आहे.

आमदारांना कोणी विचारेना

संबंधित मंत्र्याला जो अधिकारी आयुक्तपदी हवा आहे त्याला भाजपच्या आमदारांचा विरोध असल्याची चर्चा आहे. नाशिकने भाजपला पाच आमदार दिले असतानाही महायुतीत नाशिकला एकही मंत्रिपद मिळालेले नाही. फडणवीस यांनी आश्वासन देऊनही नाशिकला मंत्रिपद दिले नसल्याने भाजप आमदार नाराज आहेत. आता नाशिकमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती करतानाही त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाशिकच्या विकासाबाबत नाशिककरांनी निवडून दिलेल्या आमदारांनाही विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे आमदार नाराज झाले आहेत.

राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला भाजप आमदारांसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सहमती दर्शवली होती. नव्या दमाचा अधिकारी असल्याने नाशिक महापालिकेचा कारभार सुधारेल याचे समाधान नाशिकचे मंत्री व आमदारांना होते. परंतु, नाशिकबाहेरील मंत्र्याने हस्तक्षेप करत आपली मर्जी चालवल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्रीही नाराज झाले आहेत. आमच्याच जिल्ह्यात आमचे ऐकून घेणार नसाल, तर आमचा उपयोग काय, अशी प्रतिक्रिया एका मंत्र्याने दिली आहे. हे मंत्री आता मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कर्डिले यांच्या स्थगितीवरून महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *