Russia Drone Attack : रशियावर 9/11 सारखा भीषण हल्ला, ड्रोनने मागोमाग तीन गगनचुंबी इमारती लक्ष्य, जगभरात हाहाःकार
मॉस्को : अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण ९/११ च्या हल्ल्याची आठवण जगाला करुन देणारी घटना रशियातील कझान शहरात घडली आहे. रशियाची तिसरी राजधानी म्हणून ओळख असलेल्या कझान शहरात एकामागून एक असे तीन सीरियल ड्रोन हल्ले (यूएव्ही) करण्यात आल्याचे समोर आले आहे. कझानमधील तीन उंच इमारतींना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामुळे इमारतींचे मोठे नुकसान झाले असून जीवितहानी विषयी अद्याप वृत्त समोर आलेले नाही. यापैकी काही ड्रोन उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाने केला आहे.
रशियातील कझान शहरामधील उंच इमारतींवर UAV हल्ला झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. वेगवेगळ्या दिशांनी येणारे किलर ड्रोन (यूएव्ही) हवेत इमारतींवर आदळत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ड्रोन हल्ल्यामुळे सोवेत्स्की, किरोव्स्की आणि प्रिव्होल्स्की या तीन जिल्ह्यांतील घरांना आग लागली, असे महापौर कार्यालयाने सांगितले.
इमारतीला ड्रोन आदळल्यानंतर मोठा स्फोटही होतानाही दिसत आहे. या हल्ल्यासाठी रशियाने युक्रेनला थेट जबाबदार धरले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट करून हा ड्रोन हल्ला युक्रेनने केल्याचे म्हटले आहे
हल्ल्यानंतर आजूबाजूच्या इतर इमारतीही रिकाम्या करण्यात आल्या. रशियातून समोर आलेल्या माहितीनुसार या इमारतींमध्ये रहिवासी राहत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे या हल्ल्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अद्याप कोणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आणखी एका हल्ल्याच्या शक्यतेमुळे खबरदारी म्हणून जवळपासच्या उंच इमारतीही रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

Subscribe to my channel