Saina Nehwal : दोन तास सरावानंतर गुडघे त्रास देतात, निवृत्तीविषयी साईना नेहवाल स्पष्टच बोलली
हैदराबाद : ऑलिम्पिक पात्रता अवघड असल्याची साईना नेहवालला जाणीव आहे; पण दुखापतीमुळे सातत्याने स्पर्धांना मुकणारी भारताची बॅडमिंटनपटू साईना निवृत्तीचा विचारही करायला तयार नाही. आपली कारकीर्द पुन्हा रूळावर आणण्याचे लक्ष साईनाने बाळगले आहे.
‘एखाद दोन तास सराव केल्यावर गुडघा त्रास देतो. सरावाच्या दुसऱ्या सत्रात गुडघा वाकवणेही अवघड होते. सध्या मी इंजक्शन घेत आहे. त्यामुळे ऑलिम्पिक पात्रता अवघड असल्याची मला पूर्ण कल्पना आहे. पुनरागमनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी फिजिओ मदत करीत आहेत. कदाचित पुनरागमन लांबण्याची शक्यता आहे. पूर्ण तंदुरुस्त नसताना खेळण्यास सुरुवात केली, तर अपेक्षित यश लाभणार नाही,’ असे साईनाने सांगितले. अॅन सेऊयाँग, ताइ झु यिंग, अकेन यामागुची यांना आव्हान देण्यासाठी एक तास सराव पुरेसा नाही. खेळाचा दर्जा खूपच उंचावलेला आहे. उच्च दर्जाच्या खेळाडूंचा सामना करण्यासाठी खेळही उच्च असणे आवश्यक आहे, असे साईनाने सांगितले. सरावानंतर गुडघा त्रास देत असेल, तर तेच सामन्याच्यावेळी होणार. केवळ एक लढत खेळल्यानंतर होणार असल्यास खेळणार कसे. त्यावर मात करण्याचा माझा प्रयत्न आहे. तंदुरुस्त असेल तर खेळत राहणे, यश मिळवणे अवघड नाही. बघूया, काय होते, असेही तिने सांगितले.
‘प्रत्येक खेळाडूला निवृत्तीचा निर्णय घ्यावाच लागतो. मात्र, त्यासाठी कोणतीही मुदत नसते. शरीर साथ देणारच नाही, याची खात्री झाल्यावरच तो निर्णय होतो. मात्र, मी अजून हार मानलेली नाही. मी खेळाडू आहे, त्यामुळे प्रयत्न करणे हे माझे कामच आहे. मी बॅडमिंटनवर मनापासून प्रेम करते. त्यामुळेच मी एवढी वर्षे खेळत आहे,’ असे साईना म्हणाली. जर मला खेळता येत नसेल, तर मी पुरेसे प्रयत्न केले का हा प्रश्न मला विचारेन. सर्व प्रयत्न केले असतील, तर मला कोणताही निर्णय घेताना दुःख नसेल. एशियाड किंवा ऑलिम्पिक हे माझे लक्ष्य नाही. या दोन्ही स्पर्धात मी लक्ष्य साध्य केले आहे. सध्या माझे लक्ष्य स्पर्धा खेळण्याचे आहे, बघूया काय होते, असेही तिने नमूद केले.