Uddhav Thackeray : महाजन साहेब, मलाही भाजपमध्ये घ्या; ठाकरे गटातील बडा नेता भेटीला, उद्धव यांना दणका?
जळगाव : राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी आता महायुतीत जाण्याची चाचपणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेना ठाकरे गटातील एका पदाधिकाऱ्याने भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेत प्रवेशाची तयारी दर्शवली. मात्र, भाजपमधून या पदाधिकाऱ्याला घेण्यास नकार देण्यात आला आहे.
महाविकास आघाडीत अस्वस्थता?
स्थानिक आमदारांच्या व माजी नगरसेवकांच्या विरोधानंतर कोणाचाही प्रवेश होणार नसल्याचे प्रदेश पातळीवरील नेत्यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार सामना होऊन महायुतीचा एकतर्फी विजय झाला. त्यामुळे राज्यात आता पुढील पाच वर्षे महायुतीचेच सरकार राहणार असल्याने महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘मविआ’तील नेत्यांसह काही पदाधिकाऱ्यांनी आता महायुतीशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले आहे.
नाशिक जिल्ह्यात तर महायुतीचा एकतर्फी विजय झाला आहे. १५ पैकी तब्बल १४ जागांवर महायुतीचा विजय झाल्याने महायुतीचा एकछत्री अंमल जिल्ह्यात निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही हेच चित्र कायम राहील असे विरोधकांना वाटत आहे.
ठाकरेंचा नेता महाजनांच्या भेटीला
परिणामी महायुतीच्या नेत्यांशी ‘मविआ’तील काही पदाधिकाऱ्यांना संपर्क साधण्याची तयारी केली आहे. त्याचाच भाग म्हणून नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटातील एका पदाधिकाऱ्याने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देतानाच या पदाधिकाऱ्याने त्यांच्या छत्रछायेखाली काम करण्याची तयारी दर्शवली होती.
‘भुजबळांना मंत्रिमंडळात घ्यायला हवे होते’
दरम्यान, छगन भुजबळ हे ओबीसींचे मोठे नेते आहेत. त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे होते, असे मत भाजपचे नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचा तो अंतर्गत विषय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुजबळांनी भेट घेतली आहे. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरचा असल्याचेही महाजन म्हणाले. जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर जळगावात आलेले महाजन पत्रकारांशी बोलत होते. ‘जलसंपदा’च्या माध्यमातून राज्याचे चित्र बदलवू, असा दावाही त्यांनी केला.