Uddhav Thackeray : …म्हणून ठाकरे गटाची स्वबळाची भाषा, उदय सामंतांची टीका, न झालेल्या खातेवाटपावरही भाष्य
निखिल भुते, नागपूर : अधिवेशन आणि खातेवाटपाचा संबंध जोडता येणार नाही. खातेवाटपाचा अधिवेशनावर काहीही परिणाम झालेला नाही, असे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना विधानभवन परिसरात केले. महाविकास आघाडीचा चांगला अनुभव आल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आता स्वतंत्र लढण्याची भाषा करत आहेत, अशी टीकाही उदय सामंत यांनी यावेळी केली.
उदय सामंत नेमकं काय म्हणाले?
अधिवेशन आणि खातेवाटप यांचा संबंध जोडता येणार नाही. खातेवाटपाचा अधिवेशनावर कुठलाही परिणाम झाला नाही. खातेवाटप झाले नाही म्हणून अधिवेशन थांबले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माझ्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी विविध प्रश्नांना सभागृहात उत्तरे दिली आहेत, असे उदय सामंत म्हणाले.
मंत्री नसतानाही लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटींची तरतूद
सभागृहात अनेक बिले मांडण्यात आली आहेत. मंत्री नसतानाही १४०० कोटींची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली. खातेवाटप हा तीन पक्षांचा अंतर्गत मुद्दा आहे. योग्य वेळी लवकरात लवकर खातेवाटप होईल, असे उदय सामंत म्हणाले.
ठाकरे गटावर टीका
दरम्यान, शिवसेना ठाकरे गट हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, ‘महाविकास आघाडीचा चांगला अनुभव आल्यामुळे ठाकरे गट आता स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. प्रत्येक पक्षाचे स्वत:चे धोरण असते. त्या पक्षाने काय करावे, हे त्यांना ठरविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.’ असेही उदय सामंत पुढे म्हणाले.
मुनगंटीवार आता नाराज नाहीत : गिरीश महाजन
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात खाते मिळाले नाही म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार आता नाराज नाहीत. मुनगंटीवार आणि मी गेली अनेक दशके एकत्र काम केले आहे. त्यांना खाते मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु, ते आता रागावलेले नाहीत, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.